दिल्लीतील दोन शिवसेना! ठाकरे व शिंदेंच्या दौऱ्याने राजकीय चर्चा तापली”

राजकीय

नवी दिल्ली | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सत्तेच्या शिखरावर असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुन्हा दिल्लीच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, याच कालावधीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे एकाचवेळी दोन वेगवेगळ्या शिवसेनेचे दिल्लीतील अस्तित्व हे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.

शिंदेंची महत्त्वाची भेटमालिका

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत दाखल होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची तयारी केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांची भेट होण्याची शक्यता आहे. यामध्ये राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महायुतीतील जागावाटप, तसेच शिंदे गटाच्या पुढील राजकीय भूमिकेवर चर्चा होणार असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मात्र या दौऱ्याविषयी आपण अनभिज्ञ असल्याचे सांगून विरोधकांवर निशाणा साधला. शिंदेंवरटीका करणारे स्वतः दिल्लीत आहेत आणि काँग्रेसच्या बैठकीत सहभागी होत आहेतआधी त्यांनी आत्मपरीक्षण करावं,” असा सल्लाही त्यांनी दिला.

ठाकरे दिल्लीतील बैठकींत व्यस्त

दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आजपासून सुरू झाला असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचे नियोजन केले आहे. शिवाय, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी 7 ऑगस्ट रोजी ते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे देखील दिल्लीत आहेत.

ठाकरे गटाच्या दिल्ली भेटीत विरोधकांच्या एकत्रित रणनीती, संसदेतील भूमिकेचा समन्वय, तसेच महाराष्ट्रातील विरोधी पक्ष म्हणूनची दिशा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

 राजकीय ‘शक्तिप्रदर्शन’ की रणनीती?

एकाचवेळी दोघेही गट दिल्लीमध्ये सक्रिय असल्याने हे केवळ संयोग नसून शक्तिप्रदर्शनाचे संकेत असल्याचे अनेक राजकीय निरीक्षकांचे मत आहे. शिंदे गट सत्ताधारी असल्याने दिल्लीतील केंद्रीय सत्ताकेंद्राशी जवळीक दाखवत असताना, ठाकरे गट विरोधी आघाडी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.

पुढचं पाऊल महत्त्वाचं

या दोन्ही दौऱ्यांचे परिणाम महाराष्ट्राच्या आगामी महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांवर निश्चितच दिसून येतील. दिल्लीतील हालचालींवरून पुन्हा एकदा स्पष्ट होते की, शिवसेनेच्या दोन गटांमधील संघर्ष हा आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो राष्ट्रीय राजकारणाच्या व्यासपीठावर पोहोचला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत