मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार वेळेपूर्वी, म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे केवळ सरकारी कर्मचारीच नव्हे, तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचाही पगार उद्याच (26 ऑगस्ट) त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सणासुदीच्या काळात हातात पगार आल्याने लाखो कर्मचाऱ्यांचा आनंद निश्चितच द्विगुणित होणार आहे.
परिवहन मंत्र्यांचे यशस्वी प्रयत्न
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या या निर्णयाप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही गणेशोत्सवापूर्वी पगार मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष प्रयत्न केले. सहसा, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखेदरम्यान होतो. मात्र गणेशोत्सवाचा उत्साह लक्षात घेऊन श्री. सरनाईक यांनी गेल्या आठवड्यात वित्त विभागाकडे तातडीने निधीची मागणी करत लवकर पगार देण्याबाबतची फाईल पाठवली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला आज यश आले आहे.
वित्त विभागाकडून 477 कोटींचा निधी मंजूर
श्री. सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारने जुलै महिन्यातील सवलतमूल्य प्रतिपूर्ती म्हणून 477.25 कोटी रुपयांचा निधी एसटी महामंडळाला दिला आहे. याबाबतचा शासन निर्णयही (जीआर) जारी करण्यात आला आहे. या निधीमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या (26 ऑगस्ट) हा पगार त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा
दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब करत सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत माहिती दिली. श्री. पवार यांनी सोशल मीडियावरून जाहीर केले की, “श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तमाम सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन हे उद्या, अर्थात 26 ऑगस्टला त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.”
सरकारच्या या निर्णयामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर लाखो राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. सणांच्या खरेदीसाठी आणि इतर खर्चांसाठी लागणाऱ्या पैशांची सोय वेळेवर झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
