परळी वैजनाथ:- प्रतिनिधी
परळी वैद्यनाथ अर्बन बँकेच्या १७ संचालक पदांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (आज) जाहीर झाला, ज्यात मुंडे भगिनी-भावाच्या एकत्रित पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. यंदा प्रथमच भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे हे एकाच पॅनेलवर एकत्र आले होते, आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने तब्बल ९५ टक्क्यांहून अधिक मते मिळवत दणदणीत यश संपादन केले.
रविवारी १०८ मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला. एकूण १७ जागांपैकी १३ जागांसाठी निवडणूक झाली, तर चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या. यामध्ये महिला मतदारसंघातून डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे व माधुरी योगेश मेनकुदळे, ओबीसी मतदारसंघातून अनिल तांदळे आणि अनुसूचित जाती मतदारसंघातून विनोद जगतकर यांनी आपले स्थान बिनविरोध निश्चित केले होते.
या निवडणुकीत शरद पवार गटानेही आपले उमेदवार उभे केले होते, मात्र त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. पवार गटाचे प्रमुख उमेदवार राजाभाऊ फड यांना केवळ १,४०७ मते मिळाली, तर मुंडे पॅनेलचे रमेश कराड यांनी त्यांच्यावर जोरदार आघाडी घेत १४,३१६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. या मोठ्या मताधिक्यामुळे राजाभाऊ फड यांना आपले डिपॉझिटही गमवावे लागले.
या विजयावर प्रतिक्रिया देताना विजयी उमेदवार रमेश कराड म्हणाले, “धनुभाऊ आणि पंकजाताई मुंडे यांच्या एकत्र येण्यामुळेच हा विजय इतका सहज शक्य झाला. विरोधी गटामुळे ही निवडणूक लादली गेली, अन्यथा ही निवडणूक बिनविरोध झाली असती.”
दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांना जोडण्यासाठी परळी वैद्यनाथ अर्बन बँकेची स्थापना केली होती. त्यांच्या निधनानंतर बँकेची धुरा आता पंकजा मुंडे यांच्या हाती आहे. या बँकेच्या शाखा बीड, धाराशिव (उस्मानाबाद), सोलापूर, नवी मुंबई आणि पुणे यांसारख्या विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. या निवडणुकीतील मुंडे भगिनी-भावाच्या एकजुटीने मिळवलेल्या एकहाती विजयामुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे.
