मराठा-ओबीसी संघर्ष पेटला: लक्ष्मण हाके यांचा जरांगे-पाटलांवर जोरदार हल्ला

राजकीय

प्रतिनिधी/ नागपूर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केल्यापासून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना हाके यांनी जरांगे-पाटील यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या मागण्यांवर सडकून टीका केली.

जरांगे-पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

लक्ष्मण हाके यांनी जरांगे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, “कायद्याचे उल्लंघन करून राज्यात अस्थिरता निर्माण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मुंबईला वेठीस धरण्याचा प्रयत्न करणारा, समाजांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणारा माणूस तात्काळ तुरुंगात टाकला पाहिजे.” हाके यांनी याहीपुढे जात, जरांगे यांना मराठवाड्यातून हद्दपार करण्याची मागणी केली. “जरांगे यांचे काही सहकारी आधीच कारागृहात गेले आहेत. त्याचप्रमाणे, जरांगे यांनाही जिल्हा बंदी करून मराठवाड्याबाहेर काढले पाहिजे; अन्यथा महाराष्ट्रातील परिस्थिती शांत होणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

संविधानाची जाण नसलेला माणूस जातीय संघर्ष पेटवतोय’

जरांगे-पाटील यांच्या आंदोलन करण्याच्या पद्धतीवरही हाके यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “संविधानाची जाण नसलेला हा माणूस केवळ जातीय संघर्ष पेटवण्याचे काम करत आहे. नेत्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्ये करणे, पैशांची मोठ्या प्रमाणावर उभारणी करणे आणि विशिष्ट जात वर्चस्वासाठी चळवळ उभारणे, हाच त्यांचा मुख्य अजेंडा दिसतो.”

आंदोलनाला राजकीय पाठिंब्यावर प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता राज्यातील जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचा दावा हाके यांनी केला. मात्र, या भूमिकेमुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

आम्ही बलिदानासाठीही तयार!’

आपली लढाऊ भूमिका स्पष्ट करताना हाके यांनी आव्हानात्मक पवित्रा घेतला. “मी समोरासमोर लढायला तयार आहे. माझा पुतळा जाळण्याऐवजी, मी स्वतः सामोरा येतो. तुम्ही जाळायचा प्रयत्न करा, आम्ही ओबीसींच्या हक्कांसाठी बलिदान द्यायलाही मागे हटणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

शरद पवारांवर दुटप्पी धोरणाचा आरोप

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही लक्ष्मण हाके यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. “शरद पवारांवर ओबीसी समाजाचा विश्वास राहिलेला नाही. जर तुम्ही मनोज जरांगे यांना पाठिंबा देत असाल आणि त्याचवेळी मंडल यात्रा काढत असाल, तर हे दुटप्पी धोरण ठरते. निदान आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात तरी लोकांना दिशाभूल करू नका,” असा थेट सल्ला त्यांनी दिला.

ओबीसी आरक्षणावर मराठा समाजाचा ‘डोळा’

शेवटी, हाके यांनी ओबीसी समाजाची मुख्य चिंता व्यक्त केली. “ओबीसींच्या आरक्षणावर मराठा समाजाने डोळा ठेवला आहे. नोकरशाहीमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून आपले लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने यावर तातडीने आणि स्पष्ट भूमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे,” अशी मागणी त्यांनी केली. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला हा संघर्ष येत्या काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत