कळंब, प्रतिनिधी
दि१५ : कळंब परिसरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा आणि वाशिरा नद्यांना पूर आला असून, नदीकाठच्या शेतीत पाणी शिरल्याने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत. कळंब-पारा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अव्यहत पावसाने वाढली पाणीपातळीमागील काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू असताना, मंगळवारी पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत अव्याहत कोसळलेल्या पावसाने मांजरा आणि वाशिरा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. परिणामी, नदीपात्रातील पाणी काठावरील शेतांमध्ये घुसून परिस्थिती गंभीर बनली आहे.
पिकांचे अतोनात नुकसान, जनावरांचे बळी या पुरामुळे सोयाबीन, तूर, मका आणि कापूस यांसारख्या प्रमुख खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, ती पूर्णपणे जलमय झाली आहेत. शेतीत पाणी साचून राहिल्यास पिकांचे अधिक नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच, अचानक आलेल्या या पुराच्या पाण्यामुळे काही गावांमध्ये जनावरांच्या मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. अनेक गोठे आणि शेतमळे पाण्याखाली गेल्याने पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना या आर्थिक नुकसानीमुळे पुढील हंगामाची चिंता भेडसावत आहे.


कळंब-पारा मार्ग पूर्णपणे बंद, वाहतूक ठप्प मांजरा आणि वाशिरा नदीच्या पुरामुळे कळंब-पारा मार्ग (जो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५७ ला जोडतो) पूर्णपणे बंद झाला आहे. कळंब येथील पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे कळंब, पारा तसेच आसपासच्या गावातील नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे, तर काही ठिकाणी आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण झाला आहे.

प्रशासन सतर्क, नागरिकांना इशारापूरस्थितीची गांभीर्य लक्षात घेत, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी पात्र, पाण्याखाली गेलेले पूल आणि मार्ग यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कुठल्याही प्रकारची जोखीम न घेता सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तहसील कार्यालयाकडून पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, आवश्यक ती उपाययोजना सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी या अवकाळी आलेल्या पुरामुळे शेतकरी मात्र तीव्र चिंतेत सापडले आहेत. पिकांवर दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यास उत्पादनात मोठी घट होईल, तसेच पशुधनाच्या नुकसानीमुळे आर्थिक भार वाढेल, अशी भीती ते व्यक्त करत आहेत. राज्य शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पूरग्रस्त शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे.
