शिरपूर (धुळे) : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविरोधात 2016 मध्ये केलेल्या निराधार आरोपांमुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिरपूर न्यायालयाने त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत वॉरंट जारी केले आहे.
डॉ. मनोज महाजन यांनी 12 ऑगस्ट 2016 रोजी दमानिया यांच्या विरोधात शिरपूर पोलिसात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आज (4 ऑगस्ट) न्यायालयात दमानिया हजर राहिल्या नसल्याने, कोर्टाने त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करत 23 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, शिरपूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या वॉरंटमुळे प्रकरणाला नव्या घडामोडींचे वळण मिळाले आहे.
अंजली दमानिया यांनी गेल्या काही महिन्यांपासून महायुती सरकारवर गंभीर आरोप करत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर टीकास्त्र सोडले होते. मात्र, मी सत्याची बाजू घेऊन कोणत्याही दबावाला बळी न पडता लढत राहणार, असे स्पष्ट विधान दमानिया यांनी केले होते.
या वॉरंटनंतर दमानिया यांना आता न्यायालयात हजर होणे बंधनकारक झाले असून, आगामी काळात या प्रकरणात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
