बुलढाणा जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर आळा घालण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जिल्हा दौऱ्यादरम्यान घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना थेट एमपीडीए (Maharashtra Prevention of Dangerous Activities) कायद्यांतर्गत वाळू माफियांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे वाळू माफियांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
अवैध उत्खननात सामील अधिकाऱ्यांवर कारवाई
बावनकुळे यांनी महसूल विभागाला स्पष्ट सूचना देत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीत सामील असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच मंत्री, खासदार, आमदार यांच्याकडून कोणताही दबाव आला तरी त्याला बळी न पडता कारवाई करण्याची ताकीद दिली.
भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी आवाहन
दौऱ्यादरम्यान झालेल्या सभेत बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “महाराष्ट्र विकासाचा संकल्प मोदी आणि फडणवीस यांनी केला आहे. मात्र, तो पूर्ण करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद दाखवावी लागेल. लोकसभा-विधानसभेइतकीच ताकद स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी लावा, कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका.”
शरद पवारांवर टीका
याच प्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले की, “शरद पवारांना ओबीसींबद्दल कळवळा नाही. आम्ही मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घेणार आहोत. पवारांची भूमिका केवळ ‘नौटंकी’ असून, त्यांच्याकडे काम नसल्याने ते असे करत आहेत.”
महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्याचा संकल्प
बावनकुळे यांनी महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींवर भर देण्याचे सांगितले. यात—
- 2011 पूर्वीचे रहिवासी अतिक्रमण नियमानुकूल करणे
- नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी
- कृत्रिम वाळूचा वापर वाढवणे
- पांदण रस्ते खुले करणे
- तुकडेबंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी
त्यांनी मान्य केले की, महसूल प्रशासन हवे त्या प्रमाणात परिणामकारक काम करत नाही, मात्र ते लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यमांच्या बातम्यांना गांभीर्याने दखल
अधिकाऱ्यांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याच्या सूचना देताना बावनकुळे म्हणाले, “महसूल प्रशासन चांगले काम करत असेल तर त्याला प्रसिद्धी द्या. पण जर कुठे चूक होत असेल, तर बिनधास्त लिहा. आपल्या खात्याविरोधात बातमी आल्यानंतर त्यावर केलेली कारवाई संबंधित संपादकांना कळवावी.”
