पुराने वेढलेल्या धाराशिवला उपमुख्यमंत्र्यांचा आधार: ‘सरकार तुमच्यासोबत, चिंता करू नका’ एकनाथ शिंदेंनी पूरग्रस्तांना दिला धीर

शेती

धाराशिव: (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यातील साडेसांघवी गावावर कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पाऊस आणि बाणगंगा नदीच्या रौद्र रूपाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या पूरग्रस्त भागाला भेट देऊन पीडित शेतकऱ्यांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवला. “सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका,” असे म्हणत त्यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांना धीर दिला आणि तातडीने मदतीची ग्वाही दिली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धाराशिव जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. विशेषतः साडेसांघवी गावाला याचा सर्वाधिक तडाखा बसला. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठी वसलेल्या शेतकरी आणि ग्रामस्थांच्या घरात तसेच गोठ्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे अतोनात नुकसान झाले असून, अनेकांचे संसार अक्षरशः उघड्यावर आले आहेत.

या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी साडेसांघवी येथे धावती भेट दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. या जीवघेण्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून मदतकार्यात गती आणण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

शिंदे यांनी यावेळी नुकसानग्रस्त कुटुंबांना खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या किटचे वाटप केले, ज्यामुळे सरकारच्या संवेदनशीलतेची प्रचिती आली. पुराच्या तडाख्याने गावातील पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून, याची नोंद स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. प्रकाश देवकते यांच्या ६ शेळ्या, अशोक पाटील यांच्या ३ गायी व ४ शेळ्या, तर ज्ञानेश्वर डोंबले यांचे तब्बल १२ जनावरे वाहून गेल्याची हृदयद्रावक माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त अशोक पाटील यांच्या तब्बल १५ गायी, १० शेळ्यांसह २५ घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही आकडेवारी पाहता, गावावर कोसळलेले संकट किती मोठे आहे, याची कल्पना येते.

“तुम्ही घाबरण्याचे काहीही कारण नाही, राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूरग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांना आधार दिला. या संकटकाळात हतबल झालेले शेतकरी आणि नागरिक शासनाच्या तातडीच्या आणि ठोस मदतीची अपेक्षा करत आहेत.

यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार तानाजी सावंत, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, झाकीर सौदागर, नागनाथ नाईकवाडी, भूम शिवसेना तालुका अध्यक्ष बालाजी गुंजाळ, सत्यवान गपाट, निलेश शेळवणे, युवराज हुंबे, प्रवीण देशमुख, विशाल ढगे, समाधान सातव, विशाल अंधारे, निलेश चव्हाण, रामकिसन गव्हाणे, दत्ता नलवडे, श्रीहरी दवंडे, दत्तात्रय गायकवाड, सुभाष देवकते, अतुल शेळके, उद्धव सस्ते, बालाजी डोके आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता प्रत्यक्ष मदत कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत