“गरीब मराठ्यांना फसवू नका!” मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा, सोशल मीडियावरील पोस्टने वेधले लक्ष

राजकीय

मुंबई

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची घोषणा झाली असतानाच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. आंबेडकरांनी जरांगे-पाटील यांना उद्देशून केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जरांगे यांनी येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे, तसेच सरकारच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकार उलथवून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रकाश आंबेडकर नेमके काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया हँडलवरून मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मनोज जरांगे पाटील, तुम्ही मराठा आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात संघर्ष करत आहात. परंतु, हे सरकार कोणाचे आहे?” असा सवाल आंबेडकरांनी केला आहे.

आंबेडकर पुढे म्हणतात की, “आजच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण, नारायण राणे यांसारखे अनेक प्रस्थापित आणि धनदांडगे मराठा नेते आहेत.” एवढेच नाही, तर अडीच वर्षांपूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात अशीच मराठा नेत्यांची फौज सत्तेत होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मराठ्यांसाठी आंदोलन करता पण…”

प्रकाश आंबेडकरांनी जरांगे-पाटील यांच्या भूमिकेवर आक्षेप घेत म्हटले आहे की, “तुम्हीच निवडणुकीत या श्रीमंत मराठा नेत्यांचा प्रचार केला आणि त्यांनाच मतदान केले. तुम्ही एका बाजूला गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात, पण दुसऱ्या बाजूला याच गरीब मराठ्यांना विकासापासून वंचित ठेवणाऱ्या धनवान मराठ्यांना तुम्ही सतत पाठिंबा देत आहात. गरीब मराठ्यांची अशी दिशाभूल करू नका!” असे कळकळीचे आवाहनही आंबेडकरांनी केले.

“मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये तुम्ही याच धनाढ्य मराठा नेत्यांना पाठिंबा दिला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही तुम्ही पुन्हा तीच भूमिका घेऊन गरीब मराठ्यांना फसवणार आहात का?” असा थेट सवालही आंबेडकरांनी जरांगे-पाटील यांना विचारला आहे.

२९ ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सोमवारी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलनाच्या सविस्तर वेळापत्रकाची माहिती दिली. त्यानुसार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून मराठा समाज मोर्चा घेऊन निघेल. हा मोर्चा शहागड, पैठण, शेवगाव, पांढरी पूल, आळेफाटा मार्गे शिवनेरी गडावर मुक्कामी पोहोचेल. दुसऱ्या दिवशी, २८ ऑगस्ट रोजी चाकण, लोणावळा, वाशी, चेंबूर मार्गे रात्री मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचेल. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात होईल. या आंदोलनादरम्यान कीर्तन, भजन आणि शाहिरांच्या पोवाड्यांचे कार्यक्रमही आयोजित केले जातील, असे जरांगे-पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत