कल्याणनंतर आता मालेगाव, संभाजीनगरातही मांसविक्री बंदी; स्वातंत्र्यदिनी कुलूप, सणासुदीतही व्यवसाय बंद राहणार

छत्रपती संभाजी नगर

मुंबई: कल्याणमध्ये स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंदीच्या आदेशावरून सुरू असलेल्या वादानंतर आता मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर शहरांतही मांसविक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हिंदू संघटनांच्या मागणीनंतर आणि विविध सणांना अनुसरून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मालेगावात तीन दिवसांसाठी बंदी मालेगाव महापालिकेने १५, २० आणि २७ ऑगस्ट या तीन दिवशी सर्व प्रकारच्या मांसविक्रीच्या दुकानांना तसेच कत्तलखान्यांना पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यात स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट), श्रीकृष्ण जयंती (२० ऑगस्ट) आणि जैन पर्युषण पर्व व गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) या महत्त्वाच्या दिवसांचा समावेश आहे. धार्मिक सलोखा, सार्वजनिक शांतता आणि संवेदनशीलतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाचा अवलंब करून हा निर्णय घेण्यात आला असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

संभाजीनगरमध्ये स्वातंत्र्यदिनी बंदी दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्येही केवळ १५ ऑगस्ट रोजी सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने काढले आहेत. जन्माष्टमी आणि जैन धर्मियांच्या क्षमा पर्व मुळे महापालिकेने हा बंदी आदेश लागू केला आहे.

कल्याणमधील आदेश आणि स्पष्टीकरणकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने १५ ऑगस्ट रोजी मांसविक्री बंदी लागू केली असली तरी, हा काही नवीन आदेश नसून, जुन्या आदेशाची अंमलबजावणी असल्याचे स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार, मटण-चिकन खाण्यावर बंदी नसून केवळ विक्रीवर बंदी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात मांसविक्री बंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती आणि याच पार्श्वभूमीवर हिंदू संघटनांकडून प्रशासनाला निवेदनेही देण्यात आली होती. विशेष म्हणजे, मुस्लिमबहुल जिल्ह्यांमध्ये हे आदेश लागू करण्यात आल्याने यावरून नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत