“नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून ३६८ कोटींचा दिलासा”

शेती

मुंबई, ७ ऑगस्ट – अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ३६८ कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांच्या मदत निधीस मंजुरी दिली आहे. हा निधी छत्रपती संभाजीनगर, अमरावती, धाराशिव आणि धुळे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये वितरित केला जाणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

जून २०२५ मधील छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील अतिवृष्टी, तसेच सप्टेंबर–ऑक्टोबर २०२४ मध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यातील पिकांचे नुकसान यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागासाठी १४ कोटी ५४ लाख ६४ हजार, अमरावती विभागासाठी ८६ कोटी २३ लाख ३८ हजार आणि उर्वरित तीन जिल्ह्यांसाठी २६८ कोटी ८ लाख ८३ हजार रुपयांचा समावेश आहे.

जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७१ शेतकरी, हिंगोलीतील ३,२४७, नांदेडमधील ७,४९८, बीडमधील १०३, अमरावतीतील २,२४०, अकोलातील ६,१३६, यवतमाळातील १८६, बुलढाण्यातील ९०,३८३, वाशिममधील ८,५२७, धाराशिवमधील ३,२७,९३९, छत्रपती संभाजीनगरमधील ७,५४८ आणि धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला थेट आर्थिक मदत मिळणार आहे.

असे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. प्रशासनाच्या तत्परतेमुळे मंजुरीची प्रक्रिया जलद पूर्ण झाली. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत