गुमथी (नागपूर प्रतिनिधी
गावातील एका निष्पाप तरुणीवर एकतर्फी प्रेमातून गुरुवारी सकाळी झालेल्या चाकूहल्ल्यामुळे गुमथी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. आरोपी रोशन दीपक सोनेकर (वय ३२) या विवाहित तरुणाने २० वर्षीय तरुणीवर भाजी कापायच्या चाकूने हल्ला केला असुन . या प्रकरणात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे . तिच्या डाव्या हाताची चार बोटं पूर्णपणे निकामी झाली आहेत.
ही धक्कादायक घटना गावातील हनुमान मंदिर परिसरात घडली. तरुणी मंदिरात पूजा करण्यासाठी गेली असताना आरोपीने अचानकपणे तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. दुसऱ्या वाराआधीच तरुणीने प्रतिकार केला, मात्र चाकू थोपवण्याच्या प्रयत्नात तिच्या हाताला गंभीर इजा झाली.
पार्श्वभूमी:
या हल्ल्याची मुळे मागील अनेक घटनांमध्ये दडलेली आहेत. आरोपी रोशन गेल्या काही महिन्यांपासून पीडित तरुणीचा पाठलाग करत होता. तो अनेकदा दारूच्या नशेत तिच्यावर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करायचा. त्याने काही महिन्या पुर्वी तिला भररस्त्यात व नंतर तिच्या घरी घुसून मारहाणही केली होती. त्या विषयी संबंधित तक्रार कोराडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिस कारवाईच्या अभावामुळे आरोपीचं मनोबल अधिकच बळावलं.
सध्याची स्थिती आणि कारवाई:
हल्ल्यानंतर तरुणीला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल असुन सध्या तिच्यावर नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. प्रशासनाकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
