इंटर्न डॉक्टरला कोयता लावून धमकी; धाराशिवच्या वैद्यकीय रुग्णालयात थरार

क्राइम

धाराशिव, २ ऑगस्ट — शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका इंटर्न डॉक्टरला कोयता लावून धमकी दिल्याची घटना घडली. आरोपीने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गळ्याला कोयता लावत, “तुला कापू का?” अशी धमकी दिली. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. हिमांशु व्यास (वय २६, रा. राजस्थान) हे GMC धाराशिवमध्ये इंटर्नशिप करत आहेत. सायंकाळी हॉस्पिटल परिसरातून जात असताना स्वप्नील राऊत नावाच्या तरुणाने त्यांना अडवत त्यांच्या गळ्याला कोयता लावला. “तुला कापू का?” असे म्हणत त्यांनी डॉक्टरला धाक दाखवला. यावेळी आरोपीसोबत आणखी एक साथीदारही होता.

सदर प्रकार रुग्णालयाच्या CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टर, विद्यार्थी व कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

घटनेनंतर डॉक्टर हिमांशु व्यास यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपी स्वप्नील राऊत आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीचा उद्देश काय होता याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकाराचा निषेध करत वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांनी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. “रुग्णसेवा करताना जर डॉक्टर सुरक्षित नसेल, तर ही अतिशय गंभीर बाब आहे,” असे मत अनेक डॉक्टर संघटनांनी मांडले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत