“राज्याचे नवे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे वादाच्या भवर्यात”

मनोरंजन

प्रतिनिधी:-लोक धाराशिव न्युज

राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून नुकतेच पदभार स्वीकारलेल्या दत्ता मामा भरणे आता त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे आयोजित कार्यक्रमात भरणे यांनी केलेल्या विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार खलबते सुरु आहेत.

भरणे म्हणाले, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” या वक्तव्याने उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना मंत्र्यांकडून असा सल्ला मिळणे योग्य आहे का? असा सवाल उपस्थित होतो आहे.

माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना कृषी खात्याच्या जबाबदारीवरून हटवून दत्ता भरणे यांच्याकडे कृषी विभाग सोपवण्यात आला आहे. मात्र पदभार स्वीकारल्यानंतरच त्यांनी दिलेले हे विधान त्यांच्यासाठी अडचणीत ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनीही भरणे यांच्या विधानावर टीका केली आहे. “ते वाकडं काम करूनच सत्तेवर आले ना, ते काय सरळ मार्गाने आलेले लोक आहेत का? ते शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले. वाकडं काम करूनच सत्तेवर आलेल्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार नाही,” अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली आहे.

राऊत पुढे म्हणाले, “राहुल गांधी जे मतांची चोरी म्हणतात तेच महाराष्ट्रात झाले आहे.” त्यामुळे भरणे यांच्या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

भरणे यांनी मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. “जर आज माझे वडील आणि चुलते हयात असते, तर त्यांना आनंद झाला असता. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून, शेतकऱ्यांसाठीच काम करणार आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

तथापि, महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी असा वादग्रस्त सल्ला देणे मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या व्यक्तीस कितपत शोभते? यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत